प्रतापगड यात्रा पुर्वतयारी आढावा
गोंदिया : जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ‘प्रतापगड’ या ठिकाणी महाशिवरात्री जत्रेकरिता विविध भागातून दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक यात्रेत सहभागी होत असतात. त्यामुळे यात्रेदरम्यान भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यादृष्टीने यंत्रणांनी आपसात समन्वय ठेवून जबाबदारीने कामे करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी संबंधित विभागाला दिले.
महाशिवरात्री निमित्त प्रतापगड येथे यात्रा व्यवस्थापनाचे अनुषंगाने आज (ता.6) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी श्री. नायर बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल धोंगडे, अर्जुनी मोरगाव उपविभागीय अधिकारी वरुणकुमार सहारे, तहसिलदार अनिरुध्द कांबळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, प्रतापगड ग्रामपंचायत सरपंच भोजराम लोगडे, माजी जि.प.उपाध्यक्ष यशवंत गणवीर यांचेसह विविध विभागाचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. नायर म्हणाले, प्रतापगड यात्रेचे आयोजन महाशिवरात्रीनिमित्त 26 फेब्रुवारी ते 2 मार्च 2025 दरम्यान (5 दिवस) करण्यात आलेले आहे. कार्यकारी अभियंता पीडब्ल्युडी क्र.02 तसेच जि.प. कार्यकारी अभियंता यांनी रस्त्यांची खड्डे बुजविण्याचे काम त्वरित करावे. शाखा अभियंता जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करुन क्लोरिनेशन करावे. ग्रामसेवकाने विद्युत विभागामार्फत पथदिवे लावण्याचे काम यात्रेपूर्वी पूर्ण करावे. भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने पुरेशा औषधांचा साठा उपलब्ध करुन ठेवावा, तसेच आरोग्य पथके स्थापित करण्यात यावी. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न निरीक्षकाने दुकानातील खाद्य पदार्थांची नियमित तपासणी करावी. कार्यकारी अभियंता सा.बां. विभागाने भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या ठिकाणी बॅरिकेटींग लावावे. एस.टी. महामंडळाच्या आगार प्रमुखाने पुरेशा बसेसची व्यवस्था करावी. नगरपंचायत मुख्याधिकारी अर्जुनी मोरगाव यांनी अग्नीशमनची व्यवस्था करावी. नगरपंचायत मार्फत साफ-सफाई करण्याकडे विशेष लक्ष्य दयावे. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने यात्रे दरम्यान योग्य त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे नियोजन करावे. गटविकास अधिकारी व ग्रामपंचायत सरपंच यांनी ज्वलनशील पदार्थाची योग्य ती विल्हेवाट लावावी. गर्दीचे सुनिश्चित व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने मदत कक्ष व नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात यावे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने यात्रेदरम्यान मद्य विक्री होणार नाही याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी. भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात यावा. ग्रामपंचायत सरपंच व तहसिलदार यांनी आपसात समन्वय ठेवून योग्य नियोजन करावे. सर्व यंत्रणांनी एकमेकांच्या समन्वयातून आपआपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
Home Uncategorized भाविकांच्या सोयीसाठी सुक्ष्म नियोजन करुन जबाबदारीने कामे करा : जिल्हाधिकारी प्रजित नायर



