गोंदिया. पूर्व विदर्भावर निसर्गाने प्रलय ओतला आहे. दिवाळीनंतरही पावसाने थैमान घातले असून गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहेत. परिपक्व झालेले धान बांधात पाण्यात भिजले असून धानाला अंकुर फुटले आहेत. हे धान वाचवणे अथवा कोरडे करणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाल्याचे चित्र आहे. उभे पीक पाण्याखाली गेले असून, चिखलात अडकलेल्या पिकाची कापणी करणेही शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी-तीहेरी संकट कोसळले आहे. यामुळे पाच महिन्यांची मेहनत, कर्जाचा भार आणि कुटुंबाचा घाम एका झटक्यात वाहून गेला आहे. शेतकऱ्यांचा आत्मविश्वास खचला असून, हतबलतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
“पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत भीषण आहे. परिपक्व धान पाण्यात भिजले असून उभे पीक खाली पडले आहे. शासनाने तात्काळ आढावा घेऊन प्रत्येक धान उत्पादक शेतकऱ्याला हेक्टरी किमान एक लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर करावी,” अशी मागणी गोंदिया जिल्हा मराठी सेवा संघाचे अध्यक्ष सुनील तरोणे यांनी केली आहे. तरोणे म्हणाले, “शेतकऱ्यांच्या मेहनतीचा आणि श्रमांचा संपूर्ण चिखल झाला आहे. नुसते धानच नाही, तर गुरांचा चारा, शेतमजुरांची मजुरी, वाहतूक व्यवस्था आणि व्यापारी साखळी — सर्व काही या पावसाने उद्ध्वस्त केले आहे. शासनाने जर तातडीने मदत केली नाही, तर आत्महत्यांचे प्रमाण वाढेल, आणि याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांवर येईल.”दरम्यान, अर्जुनी मोरगाव, सालेकसा, लाखनी, साकोली आणि देवरी तालुक्यांसह पुर्व विदर्भात सलग तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे धानाचे भारे पाण्यात, शेत चिखलात आणि जनावरांचा चारा वाहून गेला आहे. शेतकरी मात्र शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत बांधावर उभा आहे. परंतु जनप्रतिनिधी मात्र या संकटकाळात ‘फरारी नेते’ ठरले आहेत. काहीजण उद्घाटने, शिबिरे, क्रिकेट स्पर्धा आणि वाढदिवसांत व्यस्त आहेत, तर शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकायला कोणीही आलेले नाही.“शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे, आणि आज त्यालाच जिवंत राहण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे,” असे सुनील तरोणे यांनी सांगून शेतकऱ्यांसाठी शासनाने तत्काळ आर्थिक मदत व गुरांच्या चार्यासाठी विशेष अनुदान जाहीर करण्याची मागणी केली आहे.






