एक दिवस– एक गाव” अभियानातून किटकजन्य आजारावर जनजागृती
7 ते 18 ऑक्टोबर दरम्यान विशेष सर्वेक्षण मोहिमेद्वारे किटकजन्य आजारावर जनजागरण
दिवाळी सणानिमित्त बाहेरगावावरुन स्वगावी आलेले मजुरांनी रक्ताची तपासणी करावी
गोंदिया : जिल्ह्यात 7 ते 18 ऑक्टोबर 2025 दरम्यान विशेष सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान सर्व ग्रामपंचायत, गावकरी व पदाधिकारी यांनी एकत्रित सहकार्याने किटकजन्य आजारावर जनजागरण करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी केले आहे. “एक दिवस – एक गाव” जनजागृती अभियान दरम्यान एका विशिष्ट दिवशी एका गावामध्ये मलेरिया निर्मूलनासाठी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. या अभियानात आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, गावकरी व पदाधिकारी यांनी समन्वयातून गावातील नागरिकांना मलेरियाची कारणे, प्रतिबंधाचे उपाय आणि उपचारांबद्दल जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोल्हार यांनी केले आहे.
गोंदिया जिल्हा हा जंगलव्याप्त भाग, घनदाट झाडी व झुडपेने नटलेला आहे. तसेच जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सर्वच ठिकाणी पाण्याचे डबके साचलेले दिसतात. सद्या डास व डास अळीसाठी पोषक वातावरण आहे. जिल्ह्यात बाराही महिने हिवताप आजाराचे रुग्ण निघत असतात. त्यामुळे डेंग्यु व हिवतापाचा जर प्रसार रोखायचा असेल तर मच्छरांसोबत डास अळी सुद्धा नष्ट करणे गरजेचे आहे. मलेरियाचा प्रसार रोखण्यासाठी डासांपासून मानवांमध्ये संक्रमण आणि मानवांकडून डासांमध्ये संक्रमण यापैकी कोणताही एक घटक खूप कमी झाला तर त्या भागातून मलेरिया व डेंग्युचे उच्चाटन होऊ शकेल त्यामुळेच जोखीमग्रस्त भागात रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषधांसोबतच डासांचे निर्मूलन किंवा चावण्यापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना केल्या जाणे आवश्यक असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी म्हटले आहे. जिल्ह्यात सन 2024 अहवालाचे अवलोकन केले असता सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत डेंग्यू व हिवतापाच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामागे स्थलांतर हे सुद्धा एक कारण असू शकते. या कालावधीत कामानिमित्त बाहेरगावी गेलेले मजूर वर्ग दिवाळी सणानिमित्त स्वगावी परत येत असतात व ते डेंग्यू व हिवतापाची लागण घेऊन येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिवाळी पूर्व व पश्चात बाहेर गावावरून परत आलेल्या व्यक्तींचा दैनंदिन शोध घेणे तसेच डासोत्पती स्थानकामध्ये डी-लार्वा फवारणी करणे, गप्पी मासे सोडणे, एक दिवस कोरडा दिवस पाळणे, शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे, व्हेंट पाईपला जाळी बांधणे, झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आवश्यक असल्यास धुर फवारणी करणे, उकिरड्यावर शेणाचे ढिगाऱ्यावर मेलीथियॉन औषधींची झुरणी डस्टिंग करणे यासारखे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांच्या कल्पक विचारातुन दि.7 ते 18 ऑक्टोबर 2025 दरम्यान विशेष सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करून हिवताप आजारावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येते. साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होते, अशा साचलेल्या पाण्याची भांडी झाकून ठेवावी, वाळवावी किंवा निचरा करावा किंवा पाण्याच्या पृष्ठभागावर तेल टाकावे जेणेकरून डासांच्या अळ्या श्वास घेऊ शकत नाही. साचलेल्या पाण्यात डासांची अंडी आणि अळ्या मारण्यासाठी ‘डी-लार्व्हा फवारणी‘ करणे अत्यंत गरजेचे आहे. डासांची पैदास थांबवल्याने डेंग्यू आणि मलेरियासारखे अनेक रोग पसरण्यापासून रोखता येत असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी दिली.
अभियानाची प्रमुख उद्दिष्ट्ये
जागरूकता वाढवणे : मलेरिया कशामुळे होतो आणि तो कसा पसरतो याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणे.
प्रतिबंधावर भर : डासांच्या उत्पत्तीच्या जागा नष्ट करणे, जसे- साचलेले पाणी रिकामे करणे आणि डासांपासून बचावासाठी मच्छरदाणीचा वापर करणे.
लवकर निदान आणि उपचार : मलेरियाची लक्षणे दिसल्यास तात्काळ आरोग्य केंद्रात जाण्याचा सल्ला देणे आणि वेळेवर उपचार घेणे महत्वाचे आहे हे समजावून सांगणे.
सामुदायिक सहभाग : मलेरिया नियंत्रणात गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग घेणे, जेणेकरून संपूर्ण गाव मलेरियामुक्त होण्यास मदत होईल.






