जनावरांना कत्तलीसाठी नेणारा वाहन पकड़ला, 15 जनावरांसह 11.50 लाखांचा मुद्देमाल जप्त

0
328

गोंदिया : गोपनीय माहितीच्या आधारावर गोरेगाव पोलिसांनी 9 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास केलेल्या नाकाबंदी कारवाईदरम्यान 15 गोवंशीय जनावरांची सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी 11.50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, एका खासगी वाहनात गोवंशीय जनावरांना निर्दयतेने कोंबून कत्तलखान्यात घेऊन जात असल्याची गुप्त माहिती गोरेगावचे ठाणेदार पोलीस निरीक्षक अजय भुसारी यांना मिळाली. दरम्यान, मिळालेल्या खात्रीलायक गोपनीय माहितीच्या आधारे गोरेगाव पोलीस पथकाने आज पहाटेच्या सुमारास गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी कारवाई केली. यावेळी (एमएच 36 – एए 3935 ) क्रमांकाचा ट्रक म्हसगावकडून गोरेगावच्या दिशेने येताना पोलीस पथकाने थांबविला. कसून तपासणी केली असता दोन जण पळून गेले. यावेळी वाहनात प्रत्येकी 10 हजारप्रमाणे 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे 15 गोवंशीय जनावरे दाटीवाटीने कोंबून भरून कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे दिसून आले. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात जनावरे व 10 लाख किंमतीचा ट्रक असा 11 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करित आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, यांच्या निर्देशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे, यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक अजय भुसारी, पोलीस उपनिरिक्षक सुजित घोलप, आनंद चव्हाण, पोलीस अंमलदार पोलीस शिपाई पवनकुमार वलथरे, शैलेंद्र बोंद्रे, तेजराम हरिणखेडे, रणधीर साखरे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here